पुणे - देशातून एकूण निर्यातीपैकी ६५ टक्के फळे व ५५ टक्के भाजीपाला निर्यात करणाऱ्या महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, गारपीट, नंतर कोरोनामुळे गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातील फळे, भाजीपाल्याची निर्यात ५० टक्क्यांहून अधिक घटण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सुरू होणारी द्राक्ष निर्यात मार्च महिना उजाडला तरी सुरू होऊ शकलेली नाही. राज्यातून प्रामुख्याने द्राक्ष, आंबा, डाळिंब, केळी, गहू तसेच भाजीपाला निर्यातीत घट होणार आहे. २०१८-१९ वर्षात २ कोटी ३० लाख ८४ हजार ६९० मेट्रिक टन शेतीमाल, फळ, फुल व प्रक्रिया केलेल्या शेतीमालाच्या निर्यातीतून देशाला १ लाख ३० हजार ३८७ कोटी परकीय चलन मिळाले. यात सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा होता. यंदा पुरेसा पाऊस झाल्याने शेतमाल व फळांच्या निर्यातीचे प्रमाण वाढण्याची प्राथमिक अंदाज होता. मात्र अवकाळी पाऊस, कोरोना महामारीमुळे निर्यातदार शेतकऱ्यांच्या मनुसुब्यावर पाणी फिरले आहे.
निर्यात शेतीमाल नाकारण्याच्या पुनरावृत्तीची शक्यता : आंब्याला आखाती देशातून मोठी मागणी असते. कोरोनामुळे विमान वाहतूक बंद होत असल्यामुळे आंबा निर्यातीची चिंता सतावते आहे. भारतीय फळ परदेशात नाकारल्याची २०१० ची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यावेळी हजारो टन भारतीय द्राक्ष कमी भावात विकावी लागली. कोरोनामुळे असे सांभाव्य नुकसान टाळण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने योग्य ती पावले उचलून किमान भाव संबंधित देशांकडून मिळण्यासाठी कार्यवाहीची गरज असल्याचे फ्रेश व्हिजिटेबल अंॅड फ्रुट एक्स्पोर्ट असोसिएशन सचिव अभिजित बसाळे म्हणाले.
चांगला भाव मिळण्याची शक्यता आफ्रिका, आखाती व युरोपीय देशात टोळधाडीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आवक कमी होऊन चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. पश्चिमी देशातून भारतीय मालाला मागणी वाढू शकते. -डॉ. रामचंद्र लोकरे, सल्लागार, कृषी आयुक्तालय, पुणे
गेल्या वर्षीच्या तुलनेने शेतीमालाची निर्यात ५० टक्क्यांवर येऊ शकते.
हवामान बदलाचा उत्पादनावर काहीसा नकारात्मक परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने ५० टक्केच शेतीमालाची निर्यात होईल. देशातून एकूण निर्यातपैकी ६५ टक्के फळ व ५५ टक्के भाजीपाला महाराष्ट्रातून निर्यात होतो. - गोविंद हांडे, तंत्रज्ञ तथा सल्लागार, कृषिमाल प्रक्रिया उद्योग निर्यात कक्ष, पुणे